मुंबई : एखाद्या व्यक्तीला फोटोग्राफीची आवड असेल पण तो मुख्यमंत्री झाला तर अडचण होते, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आमदार अमित साटम यांच्या “उडान” पुस्तकाचे लोकार्पण झाले. यावेळी बोलताना त्यांनी करिअर आणि पॅशन याबाबत भाष्य केले. त्यांच्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
फडणवीस म्हणाले, एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीची आवड असते, पॅशन असते, त्या व्यक्तीने त्याच गोष्टी कराव्यात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला फोटोग्राफीची आवड असेल पण तो मुख्यमंत्री झाला तर अडचण होते. आपल्या पॅशनलाच करिअरच्या रूपात घडवणे गरजेचे असते, असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या विधानानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकताच मी कोणाचे नाव घेतले नाही केवळ उदाहरण देत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले, अतिशय व्यस्त अशा राजकारणातून वेळ काढून अमित साटम यांनी पुस्तक लिहिले. मी थोडं वाचले आहे. नव्या पिढीला दिशा देण्याचे काम या पुस्तकातून केले आहे. अमित साटम हे आक्रमक राजकारणी आहेत. राजकारण सोडून शांत आणि संयमी व्यक्ती म्हणून अमित साटम प्रसिद्ध आहेत. ज्या विषयाची पूर्ण माहिती असते, त्या आमदारांमध्ये अमित साटम यांचे नाव येते. अनेक आमदार फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी बोलतात. फक्त तीन ते चार आमदार असे आहेत ज्यांना विषयाची पूर्ण माहिती असते, असे म्हणत त्यांनी साटम यांचे कौतुक केले.