नवी दिल्ली : महाराष्ट्रासह तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी सज्ज होत असलेल्या भाजपच्या मिशन इलेक्शनला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गती देणार आहेत. लवकरच ते तिन्ही राज्यांचे दौरे करून भाजपच्या प्रदेश शाखांच्या बैठका घेणार आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने निसटता विजय मिळवला. भाजपचे संख्याबळ घटल्याने बहुमताचा आकडा पार करताना एनडीएची दमछाक झाली. त्या निवडणुकीचा निकाल ताजा असतानाच महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू होणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपची सत्ता आहे. मात्र, त्या राज्यांत विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत लक्षणीय कामगिरी केली. त्यामुळे त्या राज्यांतील विधानसभा निवडणुका भाजपच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बहुधा ती बाब ध्यानात घेऊनच भाजपचे निवडणूक रणनीतीज्ञ मानले जाणारे शहा पुढे सरसावले आहेत.
शहा २९ जूनला हरियाणाला भेट देणार आहेत. त्यानंतर ते ५ जुलैला महाराष्ट्राचा, तर आणखी काही दिवसांनी झारखंडचा दौरा करतील. संबंधित राज्यांमधील भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या ते बैठका घेतील. पक्षाच्या प्रदेश शाखांना आगामी राजकीय रणसंग्रामासाठी सज्ज करण्याच्या दृष्टीने शहा यांच्या बैठका महत्वाच्या ठरणार आहेत.