जेरूसलेम : इस्त्रायलच्या हायफा बंदरावर हुती बंडखोरांनी ड्रोन हल्ला केला आहे. या बंदराच्या संचालनाचा करार भारतीय उद्योजक गौतम अदानी यांच्या कंपनीशी करण्यात आला आहे. त्यामुळे इस्त्रायल हमास संघर्षाची झळ आता अदानी यांनाही बसली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार हायफा हे इस्त्रायलच्या प्रमुख बंदरांपैकी एक आहे. येथे जवळपास ९९ टक्के मालवाहतुक सागरी मार्गाने केली जाते.
इराणचे समर्थन असलेल्या हुती बंडखोरांचा प्रवक्ता याह्या सारी याने बुधवारी हायफा बंदरावर झालेल्या हल्ल्याची बातमी दिली. पोर्तुगालचा ध्वज असलेल्या जहाजाला लक्ष्य करण्यात आल्याचा दावाही त्याने केला. दरम्यान हुतींनी जरी असे म्हटले असले तरी इस्त्रायलने मात्र अशा कोणत्या हल्ल्याचा इन्कार केला आहे. आम्हाला अशी कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे इस्त्रायलच्या लष्कराच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
हायफा पोर्टवर कोणती असामान्य घटना घडली असल्याचे कोणतेही संकेत मिळाले नसल्याचे प्रवक्ता म्हणाला. इस्त्रायलने गाझावर हल्ला केल्यानंतर हुती बंडखोरांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून इस्त्रायलच्या संबंधित ठिकाणांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. रविवारी हायफा बंदरावरील चार जहाजांना लक्ष्य करण्यात आल्याची बातमी या अगोदर आली होती.