T20 World Cup 2024 (Afghanistan Cricket Team Prize Money) : अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 गडी राखून पराभूत झाला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र उपांत्य फेरीचा सामना वगळता संपूर्ण टी-20 विश्वचषकात अफगाण संघाने अप्रतिम कामगिरी केली. अफगाणिस्तान संघ आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरला आहे. या संघाला सामना जिंकता आला नसला तरी आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे.
अफगाणिस्तानने ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाचा पराभव केला होता. यानंतर युगांडा आणि पापुआ न्यू गिनीविरुद्ध विजय नोंदवून संघाने सुपर-8 फेरीत स्थान निश्चित केले. जिथे अफगाण संघाचा सामना ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि भारतासारख्या संघांशी होता. या गटातून ऑस्ट्रेलिया आणि भारताचे संघ उपांत्य फेरीत पोहोचतील, असे सर्वजण गृहीत धरत होते. मात्र अफगाणिस्तान संघाने सर्व समीकरणे आणि आकडे चुकीचे सिद्ध करत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.
अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. यानंतर, त्यांनी बांगलादेश संघाचा 8 धावांनी पराभव केला आणि प्रथमच टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. अफगाणिस्तानसारख्या संघासाठी उपांत्य फेरी गाठणे चमत्कारापेक्षा कमी नव्हते.
अफगाणिस्तानला मिळतील करोडो रुपये
यावेळी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण $11.25 दशलक्ष बक्षीस रक्कम म्हणून वितरित करेल. जे भारतीय रुपयात 20.36 कोटी रुपये आहे. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 6.55 कोटी रुपये मिळतील. याशिवाय अंतिम आणि उपांत्य फेरीचे सामने वगळता प्रत्येक सामना जिंकण्यासाठी संघाला 25.9 लाख रुपये मिळतील.
टी-20 विश्वचषक स्पर्धेत अफगाण संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला आहे. आता त्यांच्या संघाला 6.55 कोटी रुपये मिळतील. उपांत्य फेरीपर्यंत त्याने पाच सामने जिंकले आहेत. त्यामुळे संघाने पाच सामने जिंकल्यामुळे 129.5 लाख रुपये मिळतील. अशाप्रकारे, अफगाणिस्तानला टी-20 विश्वचषकात एकूण 7.84 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव
अफगाणिस्तान संघाला उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तान अवघ्या 56 धावांत ऑलआऊट झाला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 8.5 षटकांत 9 गडी राखूनस लक्ष्याचा पाठलाग केला.