नवी दिल्ली : ज्येष्ठ तंत्रज्ञ सॅम पित्रोदा यांची कॉंग्रेसकडून फेरनियुक्ती करण्यात आली. त्यांना पुन्हा इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक काळात ८२ वर्षीय पित्रोदा यांनी केलेली काही वक्तव्ये वादग्रस्त ठरली. त्यावरून भाजपने कॉंग्रेसला घेरले. कोंडी होण्याच्या शक्यतेने कॉंग्रेसने पित्रोदा यांच्या वक्तव्यांपासून फारकत घेतली. त्या पार्श्वभूमीवर, पित्रोदा यांनी ८ मे यादिवशी पदाचा राजीनामा दिला.
कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तो तातडीने मंजूर केला. आता खर्गे यांनी काही आठवड्यांनंतर पित्रोदा यांची फेरनियुक्ती केली. ते कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. राहुल यांच्या परदेश दौऱ्यांवेळी पित्रोदा त्यांच्या समवेत असतात. त्यांनीच अनेक परदेशी विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसमवेत राहुल यांच्या संवादाचे कार्यक्रम घडवून आणले.
लोकसभा निवडणुकीवेळी पित्रोदा यांनी भारतातील विविधतेविषयी एक वक्तव्य केले होते. देशाच्या विविध भागांतील नागरिक चीनी, आफ्रिकी, अरब लोकांसारखे दिसत असल्याची टिप्पणी त्यांनी त्यावेळी केली होती. ती टिप्पणी वंशभेद करणारी असल्याची टीका भाजपने केली होती.