पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एल-थ्री पब रेस्टोबार येथील पार्टीत दोन्ही तरुणांना अमली पदार्थाचा पुरवठा पुण्यातूनच झाल्याची धक्कादायक बाब प्राथमिक तपासात समोर आली आहे. दरम्यान, हे ड्रग मुंबई येथून तरुण घेऊन आल्याचा अंदाज पोलिसांनी यापूर्वी व्यक्त केला होता.
या रेस्टोबारच्या शौचालयात दोघे तरुण ड्रग सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या ड्रग पुरवठा करणार्याचा शोध पोलीस घेत आहेत.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्यात “एनडीपीएस अॅक्ट’चे कलम वाढविण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांनी सांगितले.
एल थ्री रेस्टोबारमध्ये झालेल्या पार्टीत ड्रगचा वापर झाल्याची बाब समोर आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामुळे शहरात ड्रग विक्री होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे.
पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ड्रग्ज पार्टीप्रकरणात १० जणांना अटक केली आहे.
या दहा जणांकडे सखोल तपास करण्यात येत आहे. ड्रग्ज सेवन करताना व्हायरल झालेल्या व्हिडिओतील करण मिश्रा व नितीन ठोंबरे यांना अटक झाल्यानंतर ड्रग्ज विक्रीचे पुण्याचे कनेक्शन पुन्हा समोर आले आहे.
पुणे वाइब्स नावाने व्हॉटस्अॅप ग्रुप
कल्ट येथून एल-थ्री रेस्टोबारमध्ये पार्टीसाठी आलेल्या लोकांनी पुणे वाइब्स नावाने व्हाॅटस्अॅप ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपच्या माध्यमातून पार्टीची माहिती एकमेकांना देण्यात आल्याचे पुढे आले आहे.