जुन्नर, (वार्ताहर) – छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध घटनांचा उत्सव हा तिथीनुसार राज्य शासन साजरा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर केली.
यानुसार फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार साजरा होणारा शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंती सोहळा देखील राज्य शासनाच्या वतीने साजरा होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभेच्या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.
तिथीनुसार शिवजयंती उत्सवाबाबतचे सविस्तर पत्र सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांना पाठविले आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा फाल्गुन वद्य तृतीयेला शिवनेरी किल्ल्यावर 1982 पासून शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने साजरा केला जातो.
शिवजयंती सोहळा शासनाच्या वतीने तारीख की तिथीनुसार साजरी करायचा याबाबत इतिहास संशोधक, अभ्यासक, शिवभक्तांमध्ये मतमतांतरे होती. यामध्ये शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630मध्ये झाला आणि या दिवशी फाल्गुन वद्य तृतीया ही तिथी असल्याचे सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले.
मात्र शासनाने 19 फेब्रुवारी या तारखेनुसार शासकीय उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. या मतमतांतरावर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना शिवजयंती उत्सव तिथीनुसार साजरी करणार असल्याचे जाहीर केले. यानंतर हा उत्सव राज्याच्या कानाकोपर्यासह देश आणि विदेशात साजरा होऊ लागला.
इतिहास तिथीनुसारच्या शिवजयंतीचा
ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष दिवंगत बिंदुमाधव जोशी, दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, दिवंगत शाहिर किसनराव हिंगे यांनी 1982 पासून शिवनेरी स्मारक समितीच्या माध्यमातून शिवनेरीवर तिथीनुसार शिवजयंती सोहळा साजरा करण्यास सुरवात केली.
हा उत्सव गेली 42 वर्षे अखंडपणे सुरू आहे. या उत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना उपस्थित होते. पंतप्रधानांसह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत अध्यक्ष अशोक सिंघल, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी या उत्सवाला उपस्थिती लावली आहे.
शिवनेरी किल्ल्यावर तिथीनुसार साजर्या होणार्या शिवजयंती उत्सवाला राज्य शासनाने पाठबळ द्यावी, अशी मागणी आम्ही राज्य सांस्कृतिक धोरण समितीकडे केली होती. यानुसार राज्य सरकारचा सहभाग या उत्सवात वाढणार असल्याचा आनंद आहे. याबाबतचे पत्र आम्ही मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांना पाठविले आहे.
आम्ही शिवनेरी संवर्धन आणि विकासासाठी शासना सोबत काम करत आहोत. तिथीनुसार शिवजयंती शिवनेरी किल्ल्यावर साजरी होऊ लागल्यानंतर गेल्या 22 वर्षांपासून सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. – राकेश पांडव, खजिनदार, सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, जुन्नर
शासनाने तिथीनुसार शिवजयंती साजरी करावी यासाठी शिवनेरी स्मारक समिती गेली अनेक वर्षे प्रयत्नशील होती. सरकार आता तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार असल्याचा आनंद आहे. आम्ही सरकारचे अभिनंदन करतो. सरकारने तातडीने याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेत शासन निर्णय काढावा. – शाहीर हेमंत मावळे, अध्यक्ष, शिवनेरी स्मारक समिती, पुणे