जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. ते पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या संघटनेचे सदस्य असल्याचे समजते. त्याशिवाय, मारले गेलेले दहशतवादी पाकिस्तानी असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात पंधरवड्यापूर्वी दहशतवाद्यांनी सलग दोन दिवस हल्ले घडवले. त्या हल्ल्यांत सुरक्षा दलांचे जवान आणि पोलीस मिळून ७ जण जखमी झाले.
त्या हल्ल्यांनंतर सुरक्षा दलांनी संबंधित परिसरात संयुक्त शोध मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी जंगलव्याप्त भागात सुरक्षा जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंमध्ये 6 तासांपेक्षा अधिक काळ चकमक झडली. त्यामध्ये १ पोलीस जखमी झाला. चकमक थांबल्यानंतर घटनास्थळी 3 दहशतवाद्यांचे मृतदेह आढळले.
त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा साठा जप्त करण्यात आला. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी सीमेपलिकडून भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचा अंदाज आहे. त्यांचे काही साथीदार परिसरात दडले असल्याच्या शक्यतेने सुरक्षा दलांकडून आणखी काही दिवस शोधमोहीम सुरू ठेवली जाण्याची शक्यता आहे.