T20 World Cup 2024 : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेत खातेही न उघडता दोनदा बाद झाला. कोहलीच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला. टी-20 विश्वचषकात दोनदा शून्यावर बाद होणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
कोहली दोनदा शून्यावर बाद झाल्यानंतर चाहत्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की टी-20 विश्वचषकात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले टॉप-5 फलंदाज कोण आहेत? चला तर जाणून घेऊया… टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले 5 फलंदाज कोण व कोणत्या संघाचे आहेत ते….
5) रोएलॉफ व्हॅन डर मर्वे – नेदरलँड्सचा स्टार खेळाडू रोएलॉफ व्हॅन डर मर्वे टी-20 विश्वचषकात खाते न उघडता चार वेळा बाद झाला आहे. मर्व्ह 13 डावांत चार वेळा शून्यावर बाद झाला. टी-२० विश्वचषकात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत तो पाचव्या क्रमांकावर आहे.
4) कॅलम मॅक्लिओड – स्कॉटलंडचा कॅलम मॅक्लिओड टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे. मॅक्लिओड 11 डावांत चार वेळा खाते न उघडता बाद झाला.
3) जॉर्ज डॉकरेल – या अनलकी यादीत आयर्लंडच्या जॉर्ज डॉकरेलचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. डॉकरेलने टी-20 विश्वचषकात 11 डाव खेळले आणि चार वेळा खाते न उघडता बाद झाला.
2) तिलकरत्ने दिलशान – श्रीलंकेचा माजी फलंदाज तिलकरत्ने दिलशान टी-20 विश्वचषकात खाते न उघडता 5 वेळा बाद झाला आहे. टी20 विश्वचषकात दिलशानने 34 डाव खेळले आहे.
1) शाहिद आफ्रिदी – टी-20 विश्वचषकात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा लज्जास्पद विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदी 32 डावात 5 वेळा खाते न उघडता बाद झाला आहे.
कोहलीला सुर गवसणार का?
दरम्यान, भारतीय संघाने टी-20 विश्वकरंडक 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारत उपांत्य फेरीत पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. आता 27 जून रोजी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने येतील.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारताने सलग विजयांची विक्रमी वाटचाल केली असली तरीही त्यात स्टार फलंदाज विराट कोहलीचे योगदान दिसलेच नाही. तो अनेकदा तर खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तरी त्याची बॅट कमाल दाखवेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.