देहूगाव, (वार्ताहर) – देहू नगरपंचायत प्रशासन संत तुकोबांच्या ३३९ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी सज्ज झाले असून सोहळ्यासाठी तीर्थक्षेत्र देहूत दाखल होणाऱ्या भाविक वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी, सुविधांचा प्रथमच स्थानदर्शक नकाशा उपलब्ध करण्यात आला आहे.
त्यावर क्यूआर कोड स्कॅनर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना आणि वारकऱ्यांना सहज सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी दिली आहे.
देहू नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविक वारकऱ्यांना देहू परिसरात उपलब्ध करून देण्यात आलेले शुद्ध पिण्याच्या पाण्याचे टँकर, फिरते शौचालय, अग्निशमन वाहन, सरकारी दवाखाना, एनडीआरएफ (जीवरक्षक जवान), वाहनतळ यांची ठिकाणी दर्शवलेले मार्गदर्शक फलक तयार करण्यात आले आहेत.
त्यावर क्यूआर कोडचे स्कॅनर आहे. स्कॅनरमुळे भाविक वारकरी उभे असलेल्या ठिकाणापासून सुविधा किती अंतरावर आहे, याची माहीती मिळणार आहे. हा नकाशा नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने प्रथमच तयार करण्यात आला आहे.
यासाठी नगरपंचायत प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेतले आहेत. देहूतील विविध ठिकाणी याचे फलक उभारण्यात आले असून वारीत सहभागी होणाऱ्या सर्व विणेकरी, दिंडेकरी यांच्या मोबाइलवर पाठवण्यात आल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली आहे.