Rahul Gandhi | Om Birla | Speaker of the Lok Sabha – भारतीय जनता पार्टीचे राजस्थानातील कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांची १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी आवाजी मतदानाने निवड करण्यात आली. मागच्या म्हणजे १७ व्या लोकसभेचेही ते अध्यक्ष होते.
बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा झालेली निवड हा एक विक्रम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे तर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी अध्यक्ष विरोधी पक्षांनाही सभागृहात योग्य संधी देतील आणि संविधानाचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी ते पार पाडतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
निवड झाल्याबद्दल बिर्ला यांचे विरोधी पक्षांकडून आणि इंडिया आघाडीकडून अभिनंदन करताना राहुल गांधी म्हणाले की, “तुम्ही दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल तुमचे अभिनंदन. संपूर्ण विरोधी पक्ष आणि इंडिया आघाडीच्या वतीने मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो.
हे सभागृह भारतीय लोकांचा आवाज आहे. तुम्ही त्या आवाजाचे रक्षणकर्ते आहात. सरकारकडे निश्चितच सत्तेची शक्ती आहे. मात्र विरोधी पक्षही भारतीय जनतेच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करतात. सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी विरोधी पक्ष पूर्ण सहकार्य करतील मात्र त्यांना सभागृहात आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाली पाहिजे.
#WATCH | Leader of Opposition, Rahul Gandhi says “We are confident that by allowing the Opposition to speak, by allowing us to represent the people of India, you will do your duty of defending the Constitution of India. I’d like to once again congratulate you and also all the… pic.twitter.com/HU9BYyS7xm
— ANI (@ANI) June 26, 2024
तुम्ही आम्हाला भारतातील लोकांचा आवाज मांडण्याची संधी द्याल अशी आशा आहे. विरोधी पक्ष संविधानाचे रक्षण करतील अशी अपेक्षा लोकांना असते हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी देखील केलं अभिनंदन, काय म्हणाले पाहा…..
बिर्ला यांचे निवडीबद्दल अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले की, ‘त्यांच्या अध्यक्षतेखाली १८ वी लोकसभा देशातील लोकांची स्वप्ने यशस्वीपणे पूर्ण करेल. बिर्ला हे दुसऱ्यांदा सभागृहाचे अध्यक्ष होत आहेत हे या सभागृहाचे भाग्य आहे. सलग दुसऱ्यांदा हे पद स्वीकारणे हाच एक विक्रम आहे.
त्यामुळे तुम्हाला माझ्याकडून आणि संपूर्ण सभागृहाकडून मी शुभेच्छा देतो. येणाऱ्या पाच वर्षांत तुम्ही आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन कराल असा आम्हाला विश्वास असून देशाच्या आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यात तुमची महत्वाची भूमिका असणार आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे गोड हास्य सगळ्या सभागृहालाही आनंदी ठेवते.
मागच्या लोकसभेतील बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेत संमत झालेल्या ऐतिहासिक विधेयकांचा संदर्भ पंतप्रधानांनी यावेळी दिला. जे काम ७० वर्षांत झाले नाही ते काम तुमच्या अध्यक्षतेखाली या सभागृहाने करून दाखवले.
लोकसभेच्या इतिहासात दोन अध्यक्षांनंतर बिर्ला यांनाच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पुन्हा अध्यक्ष होण्याची संधी मिळली. जे लोकसभा अध्यक्ष होतात ते एकतर निवडणूक लढवत नाहीत किंवा लढवली तरी जिंकून येत नाहीत. मात्र बिर्ला पुन्हा निवडणूक जिंकून आले आहेत आणि त्यांनी इतिहास रचला आहे.’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.