Supriya Sule | Sunil Tatkare – राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आणि अध्यक्ष कोण, याचा निवाडा केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला आहे. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळ्या चिन्हांवर लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या दोन्ही गटांचा ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ सामना काही संपलेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणाऱ्या पक्षाला (शरद पवार गट) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आठ, तर निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रसेचा (अजित पवार गट) एकमेव खासदार निवडून आला आहे.
ओम बिर्ला यांना शुभेच्छा देताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांच्यात खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यावरुन जुगलबंदी पाहायला मिळाली.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे ओरिजनल संस्थापक’ आणि आमचे प्रिय नेते शरद पवार अशी केली. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व खासदारांच्यावतीने ओम बिर्ला यांना अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.
सुप्रिया सुळे यांच्यानंतर अजित पवार गटाचे एकमेव खासदार सुनील तटकरे यांना बोलण्याची संधी मिळाली. तटकरेंनी त्यांच्या भाषणाची सुरुवात ‘ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस’ अशी केली.
सुप्रिया सुळेंनी ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे ओरिजनल संस्थापक’ असा उल्लेख केला होता, त्याला प्रत्युत्तर देत तटकरेंनी जोर देऊन ‘ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस’ असा उल्लेख केला. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना सभागृहातही येत्या काळात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.