मुंबई : प्रत्येक घराची आणि घरातील प्रत्येकाची गोष्ट सांगणाऱ्या ‘घरत गणपती’ या सिनेमाचा टीझर आज रिलीज करण्यात आला. नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. नम्रता बांदिवडेकर, नवज्योत बांदिवडेकर, गौरी कालेलकर चौधरी, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मायेने आणि आपलेपणाने माणसं जोडणाऱ्या घरत कुटुंबातील ‘श्री गणराया’च्या आगमनाच्या वेळी घडणारी गमतीशीर गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
‘घरत गणपती’ चित्रपटात ‘ही’ तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार
निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.
अजिंक्य देव यांनी दिग्दर्शकाचे केले कौतुक
“या इंडस्ट्रीसाठी आणि येणाऱ्या मराठीसाठी आणि भविष्यातील स्वातंत्र्यासाठी नवज्योत खूप चांगला दिग्दर्शक आहे. आज या दिवशी आपण इथे उभे आहोत, नवज्योतचा मी खूप आभारी आहे ज्याने मला या चित्रपटात कास्ट केले आहे. त्यामुळे आता एक मोठा दिग्दर्शक सिनेसृष्टीला मिळणार आहे अशा शब्दांमध्ये अजिंक्य देव यांनी कौतुक केले आहे. येत्या 26 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.