महाबळेश्वर – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पाटण वन्यजीव परिक्षेत्रातील मौजे खुडूपलेवाडी येथे नवीन संरक्षण कुटीचे काल दि. २१ रोजी उद्घाटन करण्यात आले. या महत्वपूर्ण संरक्षण कुटीची संकल्पना व अंमलबजावणी उपसंचालक उत्तम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पदाधिकारी शिशुपाल पवार आणि त्यांच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे ही कुटी उभारण्यात आली.
ही कुटी उभारण्याचा मुख्य उद्देश वन्यजीव रक्षणासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून वृक्षतोड व वन्यजीवांच्या शिकारीवर नियंत्रण आणणे असा असून यामुळे वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण चांगल्या प्रकारे करता येईल. या उद्घाटनप्रसंगी कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक तथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक मणिकंदा रामानुजनम आणि उपसंचालक उत्तम सावंत उपस्थित होते. याचबरोबर वटपौर्णिमेच्या औचित्य साधून वटवृक्षाची रोपे लावण्यात आली. यावेळी वनसंक्षक तथा क्षेत्र संचालक मणिकंदा रामानुजम यांनी उपक्रमाचे कौतुक करून पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी एकत्रित यावे, असे आवाहन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक रवींद्र डेंगरे, वनक्षेत्रपाल शिशुपाल पवार यांच्या नेतृत्वाखाली आंबेघरचे वनपाल सचिन पाटगावकर, वेळे वनपाल मारुती करपे, वनरक्षक संजय अहिवळे, श्रीमती पार्वती सरगर, दीपक सोरट, अनिल कुंभार, बालाजी निकम, जाकिर हुसेन देसाई, कैलास पांडे यांच्याबरोबर निसर्ग मार्गदर्शक अनिल बोधे, निलेश फुटाणे, सुशांत पाटील, वाहन चालक सागर नलावडे, सुनील पाटील, सर्व वनसेवकांनी परिश्रम घेतले.