कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुढच्या म्हणजे जुलै महिन्यात होत असलेल्या विधानसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीकरता कॉंग्रेसने आपल्या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करून टाकली आहे. रायगंज येथून मोहीत सेनगुप्ता यांना तर अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या बागदा लोकसभा मतदारसंघातून अशोक हल्दर यांना कॉंग्रेसचे तिकिट देण्यात आले आहे. दोन उमेदवार जाहीर करून कॉंग्रेसने हे स्पष्ट केले आहे की लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही तृणमूल कॉंग्रेससोबत आघाडी केली जाणार नाही.
तृणमूल कॉंग्रेस पक्ष स्वत:ला इंडिया आघाडीचा घटक म्हणवतो. मात्र या पक्षाने बंगालमध्ये सर्व जागा स्वबळावर लढवल्या होत्या. त्यात त्यांची लढत प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीशीच झाली होती व कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. विशेष म्हणजे मावळत्या लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. इंडिया आघाडीचे घटक असूनही जे दोन पक्ष कॉंग्रेसच्या विरोधात लढले त्यात ममता बॅनर्जी यांची तृणमूल आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा समावेश आहे. दिल्ली आणि गुजरातमध्ये कॉंग्रेस आणि आपची आघाडी झाली होती. मात्र पंजाबमध्ये ते परस्परांच्या विरोधात लढले.