नगर, (प्रतिनिधी) – शहरातील मोकाट कुत्रे पकडून त्यांचे निर्बिजीकरण करणारी महापालिकेची यंत्रणा तब्बल नऊ महिन्यांपासून ठप्प आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढतच चालला आहे. शहरात सुमारे 25 हजारांपेक्षा जास्त मोकाट कुत्रे आहे.
चौकाचौकात आणि रस्त्यांवर टोळ्यांनी फिरणारी ही कुत्रे रात्री दुचाकीस्वारांचा पाठलाग करतात, कधी कुणाला चावा घेतात. कुत्र्यांच्या भीतीमुळे तर लहान मुलांना घराबाहेर सोडणेही धोक्याचे ठरत आहे. कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मनपाकडून काहीच उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मनपाने शहरातील मोकाट कुत्रे पकडून त्यांचे लसीकरण व निर्बिजीकरणाचा ठेका पीपल्स फॉर अॅनिमल या संस्थेला दिला होता. जुलै 2023 या संस्थेच्या कामाचा ठेका संपला. त्यामुळे कुत्रे पकडण्याचे काम ठप्प झाले. त्यानंतर मनपाने तातडीने निविदा प्रक्रिया राबवून नवीन संस्थेला हे काम देणे अपेक्षित होते.
मात्र, निविदा प्रक्रिया राबविण्यास मनपाने विलंब केला. पहिल्यांदा निविदा काढली, तेव्हा ठेकेदार संस्थांचा प्रतिसाद मिळाला नाही. दुसर्यांदा निविदा प्रसिद्ध केली, तेव्हा चार संस्थांनी अर्ज केला. मात्र, या निविदा उघडण्याआधीच आचारसंहिता लागली. आता आणखी एक ते दोन महिने निविदा प्रक्रियेचे काम ठप्प राहणार आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच जाणार आहे.
अॅनिमल वेस्टमुळे वाढला हिंस्त्रपणा
कत्तलखान्यातील अॅनिमल वेस्ट, हॉटेलमधील नॉनव्हेज वेस्ट गोण्यांमध्ये भरून सर्रास नाल्यांमध्ये फेकून दिले जात आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांना हे खाद्य सहज उपलब्ध होते. या खाण्यामुळे कुत्रे अधिक हिंस्र होऊन नागरिकांवर हल्ले करत आहेत.
शहरात कुत्र्यांच्या टोळ्यांचे साम्राज्य
शहरातील जुने आरटीओ कार्यालय परिसरातील नाला, कोठला स्थानक परिसर, छत्रपती संभाजीनगर रोडवरील इंद्रायणी हॉटेल तर पुढील ओढ्याच्या दरम्यान तपोवन रोड, स्टेशन रोड, सीना नदी, बोल्हेगाव पूल, पत्रकार चौक आदी परिसरात नॉनव्हेज वेस्ट फेकले जात असल्याने येथे रात्री मोठ्या प्रमाणात कुत्र्यांच्या टोळ्या दिसतात.
मोकाट कुत्र्यांचे लसीकरण, निर्बिजीकरणासाठी दोनवेळा निविदा प्रसिद्ध केली. पहिल्यांदा प्रतिसाद मिळाला नाही. दुसर्या वेळेस चार संस्थांचा प्रतिसाद आला. मात्र, आचारसंहितेमुळे या निविदा उघडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या यंत्रणा बंद आहे. मात्र, पिसाळलेले कुत्रे पकडण्यासाठी बाहेरून माणसे बोलावून त्यांचा बंदोबस्त केला जातो. दृश्यंत बत्तूल, कोंडवाडा विभागप्रमुख महापालिका