Lok Sabha Result 2024 | लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीनंतर आता काही वेळानंतर लोकसभा निवडणुकींच्या निकालाचे चित्र स्पष्ट होईल. राज्यात 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील निवडणुकाला सुरुवात विदर्भातील पाच लोकसभा मतदार संघातून झाली होती. यातील नागपूरची निवडणूक महत्वाची मानली जात आहे. येथून नागपूर मतदारसंघात भाजपचे नेते आणि विद्यामन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्यात थेट लढत होत आहे.
नागपूरमध्ये नितीन गडकरी आघाडीवर
त्यानुसार आता नितीन गडकरी यांनी नागपूरमधून आघडी घेतली आहे. पहिल्या फेरीत नितीन गडकरी 11 हजार 675 मतांनी आघाडीवर आहे. तर विकास ठाकरे पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आघाडी घेतली आहे.
चंद्रपूरमध्ये भाजपला धक्का
चंद्रपूर मतदारसंघात दुसरी फेरीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर 19 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची पिछाडी असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे चंद्रपूरमधून समोर आलेली आकडेवारी भाजसाठी धक्कादायक ठरू शकते.
अमरावतीत नवनीत राणा पिछाडीवर
तर रामटेक मतदारसंघात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 7440 मतांनी आघाडीवर आहेत तर शिवसेनेचे राजू पारवे पिछाडीवर आहेत. विदर्भातील हॉट सीट असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. तर मविआचे उमेदवार बळवंत वानखडे 3539 मतांनी आघाडीवर आहे. अकोल्यात पाचव्या फेरी अखेर काँग्रेसचे डॉ.अभय पाटील 2983 मतांनी आघाडीवर आहेत तर भाजपचे अनुप धोत्रे दुसऱ्या आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
तर वर्ध्यात भाजपचे रामदास तडस यांना आतापर्यंत 46506 तर महाविकास आघाडीचे अमर काळे यांना 53235 मते मिळाली आहे. यवतमाळ-वाशिमममधुन संजय देशमुख आघाडीवर आहेत तर राजश्री पाटील या पिछाडीवर आहेत.
भंडारा – गोंदिया आणि बुलढाणा लोकसभा मतदार संघातील स्थिती
भंडारा – गोंदिया लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना 30488 आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ प्रशांत पडोळे यांना आतापर्यंत 29210 मत मिळाली आहेत. तर बुलढण्यात प्रतापराव जाधव हे आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यांना १५१९९ मते आतापर्यंत मिळाली आहे. तर नरेंद्र खेडेकर यांना ११६८७ आणि रविकांत तुपकर १०१५९ मत मिळाली आहे. सध्या प्रतापराव जाधव ३५१२ मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.