नगर – बॅंकेचा परवान रद्द झालेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बॅक वाचविण्यासाठी आता सत्ताधारी व विरोधक एकत्र येण्याचा प्रयत्नात असून बॅंक वाचविण्यासाठी दोघांकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ठरले आहे. त्यामुळे आता बॅंकेच्या ठेवीदारसह सभासद व कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
बॅंक बचाव समितीचे प्रतिनिधी व बॅंकेच्या विद्यमान संचालक यांची संयुक्त बैठक नुकतीच बॅंकेचे ज्येष्ठ सभासद राजेंद्र चोपडा यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी बॅंकेच्या संचालक मंडळातर्फे विद्यमान अध्यक्ष अशोक कटारिया, माजी अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल तसेच संचालक मंडळ सदस्य अनिल कोठारी, शैलेश मुनोत, अजय बोरा, दीपक गांधी, मनेश साठे, गिरीश लाहोटी तसेच 2014 ते 2019 या काळातील संचालक ऍड. केदार केसकर व किशोर बोरा तर बॅंक बचाव समितीतर्फे बॅंकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, वसंत लोढा, ऍड. अच्युत पिंगळे, सीए राजेंद्र काळे, मनोज गुंदेचा, डी. एम. कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. या संयुक्त बैठकीत बॅंकेचे लायसन्स परत मिळविणे किंवा निदान बॅंकींग परवाना रद्दच्या आदेशाला स्थगिती मिळविणे या दोनच मुद्यांवर चर्चा झाली.
बॅंक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांनी संचालक मंडळाला आवाहन केले की, अपिलाचा मसुदा यशस्वी होण्यासाठी त्यावर एकत्र चर्चा करून त्या मसुद्यामध्ये योग्य बदल सुचविण्यासाठी बॅंकेचे संचालक मंडळ व बॅंक बचाव समितीची संयुक्त बैठक होणे आवश्यक आहे व बॅंक बचाव समिती त्यासाठी आवश्यक सहकार्य करायला तयार आहे. बॅंक बचाव समितीच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत बॅंकेचे चेअरमन अशोक कटारिया यांनी बचाव समितीच्या प्रमुख सदस्यांना फोन करून चोपडा यांच्या निवासस्थानी संयुक्त बैठक घेण्याचे मान्य केले व त्यानुसार ही बैठक नुकतीच झाली.
निधी उभारणीवर चर्चा
बॅंकेचे ठेवीदार, सभासद व कर्मचारी यांच्यावतीने वेगळा हस्तक्षेप अर्ज दाखल होणे अत्यंत आवश्यक असल्याची बाब बॅंक बचाव समितीने संचालक मंडळाच्या निदर्शनास आणून दिली व त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक निधी उभारणीवर देखील चर्चा झाली. हे दोन्ही मुद्दे संचालक मंडळाने मान्य केले असल्याने आता सत्ताधारी व विरोधकांच्या एकत्रित प्रयत्नाने अर्बन बॅंक वाचण्याची आशा पल्लवीत झाल्याचे मानले जात आहे.