बिबवेवाडी, -सॅलिसबरी पार्क येथील नवीन उद्यानाच्या नावाच्या वादात काही नागरिकांनी “शांतता राखावी, वाद नको’, असे फलक हातात घेत उद्यानाला दिलेल्या प्रा. यशवंतराव भीमाले उद्यान नावात नामांतराचा वाद नको, असे म्हणत उद्यानासमोर एकत्र येत घोषणा दिल्या.
पुणे शहराच्या वैभवात ज्यांनी-ज्यांनी योगदान दिले आहे त्यांची आठवण म्हणून शहरातील विविध ठिकाणच्या महानगरपालिकेच्या सभागृहांना, सामाजिक, सांस्कृतिक घटक, व्यायामशाळा, उद्याने, रस्ते, नाट्यगृह आदी महानगरपालिकेच्या वास्तूंना अशा व्यक्तींची नाव दिले जातात, यासाठी महानगरपालिकेच्या नाव समिती, मुख्यसभा, गटनेते, महापौर स्थायी समिती आदींच्या ठरावानुसार व मान्यतेने नाव दिले जाते. त्यानुसार सॅलिसबरी पार्क येथील नव्याने विकसित झालेल्या उद्यानास स्व.प्रा. यशवंत भीमाले यांचे नाव देण्याचे मान्य झाले असताना याबाबत भविष्यात वाद नको, अशी भूमिका येथे एकत्र आलेल्या नागरिकांनी मांडली आहे.
उद्यानाच्या नावाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन उद्यानास स्व. प्रा. यशवंत भीमाले नाव देण्यात आले आहे. याबाबत कोणतेही राजकारण होऊ नये, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. उद्यानाच्या नावाला पाठिंबा देण्यासाठी स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत, हीच माझ्या विकासकामांची पावती आहे. त्यामुळे यापुढेही परिसरातील विकास हेच माझे ध्येय राहील. नामकरणाचा वाद आता संपला आहे. – श्रीनाथ भीमाले, माजी नगरसेवक, भाजप पक्ष