नव्या वेतनमानामुळे स्त्री कामगारांचे नुकसान
पुणे, दि. 7 – नव्या वेतनमानामुळे गरजू स्त्री कामगारांचे मोठे नुकसान होणार असल्याचे उद्योजिका यमुनाबाई किर्लोस्कर यांनी सांगितले. किमान वेतन ठरविताना ज्यांना एकदम खूप वाढ द्यावी लागेल, त्याचा फायदा जरूर होईल.
परंतु कारखान्याच्या एकूण जमाखर्चाची तोंडमिळवणी होणे किंवा नाही याचाही हिशेब काढला पाहिजे. नव्या नियमांचे वेतन परवडण्यासाठी प्रत्येक स्त्री कामगाराला आजच्यापेक्षा दुप्पट काम करावे लागेल. प्रत्येक स्त्रीला ते जमेलच असे नाही. ज्यांना जमणार नाही त्यांचे नुकसानच होईल.
ताग कामगारांचा संप चालूच
कलकत्ता – पश्चिम बंगालमधील 62 ताग गिरण्यातील सुमारे अडीच लाख कामगारांनी काल सुरू केलेला बेमुदत संप आज तडजोडीचे काहीही चिन्हे न दिसता चालू होता. गिरण्यांच्या परिसरात पोलिसांची गस्त चालू असून परिस्थिती शांत आहे.
मार्क्स-एंगल्सचे संपूर्ण वाङ्मय प्रकाशित होणार
लंडन – कार्ल मार्क्स व फ्रेडरिक एंगल्स या साम्यवादी तत्त्ववेत्त्यांचे संपूर्ण वाङ्मय इंग्रजीतून प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे काल जाहीर करण्यात आले. एकूण 50 खंडांत ते प्रसिद्ध होणार आहे. आतापर्यंत मार्क्स व एंगल्सचे संपूर्ण वाङ्मय जर्मन भाषेतून प्रसिद्ध झाले आहे. त्याचे 40 हून अधिक खंड आहेत.
मंगलोर बंदराचे 11 तारखेस उद्घाटन
बंगलोर – मंगलोर बंदराचे उद्घाटन दि. 11 जानेवारी रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे हस्ते होणार आहे. कर्नाटकाची प्रगती वेगाने होण्यास या बंदरामुळे मदत होणार आहे. खनिजे, लोखंड व मॅंगनीज यांच्या निर्यातीसाठी या बंदराचा फार उपयोग होणार आहे. तेथून काजूची निर्यात करण्याचाही कर्नाटक सरकारचा विचार आहे.