बीजिंग : चीनममधील सेंट्रल हुनान प्रांतात मुसळधार पाऊस आणि पर्वतीय वादळामुळे चार जणांचा मृत्यू झाला आणि एक बेपत्ता झाला आहे. सेंट्रल हुनान काउंटीने आपत्कालीन प्रतिसाद कार्यक्रम सक्रिय केला आहे आणि आवश्यक पुरवठा आणि वीज, दूरसंचार आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्याच्या कामासाठी प्रयत्न केले जात आहेत.
या प्रदेशाच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूर्वेकडील हुएँगशान या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील हजारो लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे आणि डझनभर निसर्गरम्य पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. एकट्या हुआंगशानमधील राष्ट्रीय पातळीवरील अ श्रेणीची एकूण ४३ पर्यटन स्थळे तीव्र विपरीत हवामानामुळे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.
आन्हुई प्रांतात १८ जूनपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे ४ लाखाहून अधिक रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि रविवारपर्यंत पन्नास हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. चीनच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने अनहुई, जिआंग्शी, झेजियांग आणि गुइझोउ या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
स्वित्झर्लंडमध्येही अतिवृष्टीचे संकट
स्वित्झर्लंडमध्येही अतिवृष्टीचे संकट आहे. प्रचंड गडगडाट आणि पावसामुळे खडक कोसळल्याने बेपत्ता झालेल्या तीन लोकांपैकी एकाचा मृतदेह बचावकर्त्यांना शनिवारी देशाच्या आग्नेय भागात सापडला आहे. अन्य दोघे अजूनही बेपत्ता आहेत. रात्री मुसळधार पावसामुळे शोधमोहीम थांबवावी लागली. शनिवारी सकाळी मातीच्या ढिगाऱ्याखालून एका महिलेला जिवंत बाहेर काढण्यात आले. इटलीच्या दिशेने जाणारा स्विस मोटरवे ए-१३ या महामार्गाचा एक भाग पुरामुळे पूर्णपणे नष्ट झाला, असे स्विस अधिकाऱ्यांनी सांगितले.