पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – केंद्रीय प्लॅस्टिक पथकाने ३०० किलोच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या पकडल्या. या पिशव्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोला पकडून ज्या व्यावसायिकाला त्या दिल्या जाणार होत्या, त्याच्याकडून १० हजार रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
बालगंधर्व रंगमंदीरासमोर दुपारी दिडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. महापालिकेकडून शहरात पालखीच्या कालावधीत बंदी असलेले प्लॅस्टीकच्या पिशव्या वापरण्यात येऊ नयेत म्हणून जनजागृती करण्यात येत आहे.
तसेच शहरात महापालिकेने केंद्रीय प्लॅस्टिक पथक स्थापन केले असून त्यांच्या मार्फत कारवाईही केली जात आहे. गुरूवारी दुपारी हे पथक जंगली महाराज रस्त्याने जात असताना त्यांना एका टेम्पोत मोठया प्रमाणात पिशव्यांनी भरलेल्या बॅग दिसल्या त्यामुळे संशय आल्याने त्यांनी संबधित टेम्पोला थांबण्यास सांगितले. त्या टेम्पो चालकाला पिशव्यांबाबत विचारणा करताना त्याने सुरूवातीला माहिती देण्यास नकार दिला.
नंतर त्यांने ट्रान्सपोर्ट ट्रक मधून माल आल्याचे सांगितले. तसेच डेक्कनकडे घेऊन जात असल्याचे सांगितले, मात्र, कोणाचा माल आहे याची माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर पालिकेने दंडाचा बडगा उभारताच टेम्पो चालकाने संबधितांचा मोबाइल क्रमांक दिला, त्यानंतर पालिकेने या पिशव्या जप्त केल्या तसेच व्यावसायिकाकडून १० हजार रूपयांचा दंडही आकारला आहे.
प्रमुख आरोग्य निरीक्षक आय.एस. इनामदार साहेब यां, आरोग्य निरीक्षक शाहु पोकळे, उमेश देवकर,राजेश रासकर, अमोल पवार, जालिंदर चांदगुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.