- “मानकरी’ अधिकाऱ्याची योजना गुंडाळली?
- सहा महिन्यांपासून घोषणाच नाही
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दर महिन्याला मानकरी म्हणून गौरविले जात होते. जो अधिकारी त्या महिन्यामध्ये उत्तम काम करेल त्याची निवड केली जात होती तसेच संबंधित अधिकाऱ्याचे नाव व फोटो महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत होता. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या नावांची घोषणाच झाली नसून सहा महिन्यांपूर्वीच्याच मानकऱ्याचे छायाचित्र आजही महिन्याचा मानकरी म्हणून संकेतस्थळावर चिटकविण्यात आले आहे. आयुक्तांचे दूर्लक्ष की गेल्या सहा महिन्यांत महापालिकेत एकही अधिकारी मानकरीपदासाठी “लायक’ ठरला नाही, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. अधिकाऱ्यांना चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी “महिन्याचे मानकरी’ ही अभिनव योजना पालिकेत राबविली जात होती.
महापालिकेच्या प्रत्येक विभागातील अधिकाऱ्याचे प्रत्येक महिन्यात तपासून कार्यक्षम अधिकाऱ्याला महिन्याचा मानकरी हा किताब जाहीर केला जात होता. तसेच त्याची संपूर्ण माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जात होती.
गेल्या सहा महिन्यांपासून महिन्याचा मानकरीच निवडला नसल्याचेच समोर आले आहे. ऑगस्ट 2019 या महिन्यामध्ये अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे यांची महिन्याचे मानकरी म्हणून निवड करण्यात आली होती. निगडी ते दापोडी या पुणे मुंबई मार्गावर बीआरटी मार्ग सुरु करण्यासाठी पीएमपीएल व पोलीस प्रशासनाशी चांगला समन्वय त्यांनी ठेवला होता. तसेच आयआयटी मुंबई यांच्यामार्फत बीआरटी मार्गाची तांत्रिक तपासणी त्यांनी करून घेतली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ऑगस्ट 2019 या महिन्याचे मानकरी ठरविण्यात आले होते.
ऑगस्ट महिन्यानंतर मात्र प्रशासनाने एकाही अधिकाऱ्याच्या कार्याची दखल घेतली नाही. अधिकाऱ्यांच्या चांगल्या कार्याकडे आयुक्त दुर्लक्ष करत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. मोठा गाजावाजा करत “महिन्याचे मानकरी’ ही योजना सुरु करण्यात आली. मात्र त्याला महापालिका प्रशासनानेच हरताळ फासल्याचे स्पष्ट झाले आहे.
“लायक’ नाहीत की हात आखडता
गेल्या सहा महिन्यांत एकही अधिकारी “महिन्याचा मानकरी’ न ठरल्यामुळे सहा महिन्यात एकाही अधिकाऱ्याने निवडीलायक काम केले नाही की आयुक्तांनी मानकरी ठरवून अधिकाऱ्याचे कौतुक करण्यासाठी हात आखडता घेतला, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
संकतेस्थळावर नावे अपलोड करण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण नाही. मात्र महिन्याचे मानकरी निवडीचे नावे आमच्याकडे आले नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये डॉ. ज्ञानदेव जुंधारे यांची महिन्याचे मानकरी म्हणून निवड झाली त्यानंतर पुन्हा निवड झाली नसल्याने त्यांचेच नाव संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहे.
– निळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी.